बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर छापा ७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांची मोठी कारवाई
साईमत /अमळनेर/प्रतिनिधी |
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या धडक कारवाईत अमळनेर शहरातील बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्याचा पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे एकाचवेळी दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल ७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी १८ जणांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेदरम्यान विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पारधीवाडा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानाच्या मागील बाजूस तसेच जपान जिन परिसरात एकाचवेळी छापे टाकले.
या कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून १ हजार ५७५ किलो गोमांस, तीन जिवंत बैल, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडी, सु-या, कोयते, वजनकाटे आणि अन्य साहित्य असा एकूण ७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत १८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वॉल्टे, दीपक जगदाळे, पोहेकॉ हरिलाल पाटील, निलेश सोनवणे, रवींद्र पाटील, दीपक माळी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे, मयूर निकम, राहुल कोळी, विलास गायकवाड तसेच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज आणि त्यांच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या प्रकारांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
