साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा काल अखेर शेवट झाला. दहा दिवस चाललेले शिवसेनेतील राजकीय बंड, त्यानंतर आलेले ट्विस्ट या सगळ्या घडामोडीत एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis)शपथ घेतली. त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेत काही निर्णयही घेतले. मात्र असे असले तरी कालपासून चर्चा रंगतेय ती फडणवीसांच्या नाराजीची आणि भाजपच्या (BJP) अंतर्गत वादांची. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले, जे काही राजकीय घडामोड घडली ती राज्याच्या हितासाठी आहे. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने दिलेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्याने मन आभाळ एवढे मोठे आहे, त्यांनी निर्णय मान्य केला. देवेंद्र यांनी २०१४ मध्येही कुठलेही पद मागितले नव्हते. २०१९मध्ये त्यांनी मेहनत केली. राज्यासाठी योग्य तो निर्णय घेतला. हा फक्त ट्रेलर आहे अजून देवेंद्र फडणवीस यांचा मोठा चित्रपट यायचा आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न नाही, हा चित्रपट आहे, २०२४ लोकसभा आणि विधानसभेत निवडणुकीत तो दिसेल. युती आम्ही तोडली का, खोटं कोण बोललं, पाठीत खंजीर खुपसला, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांना तरी कुठे अनुभव होता. राष्ट्रवादीमध्ये ज्यांना अनुभव होता ते उपमुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंना अनुभव आहे, त्यांच्या बरोबर ड्रायव्हिंग सीटवर फडणवीस असणार आहेत, असे शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरे विकासाच्या कामात स्पीड ब्रेकर होते, आता विकासाची काम वेगाने होतील. शिंदे सरकार योग्य पद्धतीने काम करणार, जनतेचा सुप्रशासन देणार. बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे, ते त्यांना विरोध करीत आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना बरोबर आहोत. फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाबाबत ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. यावर शेलार म्हणाले, कोणत्या राज्यातील नेत्यांसाठी पक्षश्रेष्ठी यांनी सार्वजनिकरित्या आवाहन केलं ? कोणासाठी पुढे येऊन सत्तेत बसावे म्हणून विनंती केली, मोदी यांच्या टि्वटनंतर हे स्पष्ट झाले आहे.