साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथील भडगाव रस्त्यावरील प्रणव सुपर शॉपी हे शुभारंभापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी फोडत काही सामान लांबविला तर काही अंतरावरील शांकभरी इलेक्ट्रिक दुकानाचे कुलुप तोडत चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पो.कॉ.नरेंद्र विसपुते यांनी भेट देऊन पाहणी केली.
येथील भडगाव रस्त्यावर नव्यानेच सुरू होत असलेल्या प्रणव सुपर शॉपी हे या दुकानाचे उद्घाटन होण्याअगोदरच चोरट्यांनी चोरी करत उद्घाटन केले. दुकानाचे येत्या दोन दिवसात उद्घाटन होणार होते. त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असतांनाच ११ रोजीच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवत आत प्रवेश करत दुकानातील काही साहित्य चोरून नेताना काही पुरावा राहु नये, यासाठी सीसीटीव्हीचा डिव्हीआर लांबविला आहे. तेथुन काही अंतरावरील चाळीसगाव रस्त्यावरील शांकभरी इलेक्ट्रिक दुकानाच्या दोन्ही शटरचे कुलुप तोडत चोरीचा प्रयत्न सुरू असतांनाच कुणी आल्याची चाहुल लागल्याने तेथुन पळ काढला. एकाच रात्रीत भडगाव, चाळीसगाव या मुख्य रस्त्याला लागुन अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी दोन दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
गुन्हेगार प्रवृत्तींनी काढले डोकेवर
वीस दिवसांपूर्वी एकाच रात्रीत तीन, चार चाकी वाहन चोरण्याचा प्रयत्न झाला. त्यात एक चारचाकी वाहन चोरट्यांनी लांबविले.चोरीचा तपास लागत नाही तोच पुन्हा ११ रोजीच्या मध्यरात्रीनंतर चोरी करत पोलिसांना आव्हान दिले आहे. कारण कजगाव पोलीस मदत केंद्राच्या समोरच सुपर शॉपी फोडले आहे. २१ मे ला त्याच जागेवरून आयशर हे मालवाहू ट्रक चोरीचा प्रयत्न झाला होता. पोलीस मदत केंद्र हे वाऱ्यावर असल्याचे गुन्हेगार प्रवृत्तीस कळल्याने ही प्रवृत्ती डोकंवर काढत पोलिसांनाच आव्हान देत आहेत. या बाबींचा पोलीस निरीक्षक पवार यांनी गांभीर्याने विचार करून कजगाव पोलीस चौकीस कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन, शांतताप्रिय नागरिकांनी केली आहे.