जखमी माकडाचा उपचारापूर्वीच मृत्यू
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील बसथांब्याजवळ रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत भरधाव कारच्या धडकेत एका माकडाचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असलेल्या माकडांच्या कळपाला कारने जोरदार धडक दिल्याने एक माकड गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वरणगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव कारने निंभोरा बसथांब्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या पाच ते सहा माकडांच्या कळपाला धडक दिली. या अपघातात एका माकडाला जोरदार मार लागल्याने ते रस्त्यावर कोसळले. धडक एवढी तीव्र होती की माकड गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडले.
घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी माकडाला रस्त्याच्या कडेला हलवून त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. गावातील जिजारसिंग निले यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीने माकडाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी प्रकाश सरदार यांनी तातडीने वनविभागाचे कर्मचारी राजेश सोनोने यांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच राजेश सोनोने यांनी वनपाल अनिल साळुंके यांना घटनेची कल्पना दिली. वनपाल साळुंके यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून जखमी माकडाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माकडाला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वाढत्या वाहनांच्या वेगामुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वनविभागाने या घटनेची नोंद घेतली असून, धडक देणाऱ्या अज्ञात कारचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी अधिक काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
