साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी, पुणे तसेच परिवर्तन संस्था, सातारा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठात ‘युवा मानसरंग’ कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक आरोग्य विषयक जनजागृती करणे होता. कार्यशाळेत विद्यापीठ परिसरातील ३९ विद्यार्थी, ८ शिक्षक आणि ४ शिक्षकेत्तर कर्मचारी असे ५१ जण सहभागी झाले होते. कार्यशाळे दरम्यान विद्यापीठ परिसरातील विविध प्रशाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन मानसिक आरोग्य चाचणी घेण्यात आली.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते. कार्यशाळेत अकादमीमार्फत तोशिता तंडेल, रूपेश तेम्भे उपस्थित होते. कार्यशाळेत परिवर्तन संस्था सातारामार्फत कृतार्थ शेगावकर, योगिनी मगर, राणी बाबर आणि ब्रम्हानंद यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवसीय कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. संजीवनी भालसिंग, डॉ. उमेश गोगडीया यांनी काम पाहिले.