मुलीशी बोलतो म्हणून तरूणाचा काढला काटा

0
28

साईमत जळगाव प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरातील ट्रकचालका सोबत रात्री वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्या तरुण ट्रकचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात रात्री उशिरा पर्यन्त खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रमेश पालवे (वय-२५) रा. मालदभाडी ता. जामनेर असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, सागर रमेश पालवे हा आई, वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता.याबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात मयत सागर ची आई निलम रमेश पालवे यांच्या फिर्यादि वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे पती रमेश हरी पालवे, मुलगा सागर पालवे यांचेसह राहते. तसेच मी शेत मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करते. तसेच माझा मुलगा सागर रमेश पालवे हा जळगाव येथील विदर्भ रोडलाईन्स, ढोर बाजार मार्केट जळगाव येथे ड्रायव्हर म्हणून दोन वर्षापासून कामास होता. तसेच तो आठवडयातून एक दिवस घरी येत असे.
दि. ०७/०९/२०२३ रोजी रात्री ०९.३० वा. ते १०.०० वा. दरम्यान माझा मुलगा सागर याचा मला फोन आला की, माझे सोबत काम करणारे निलेश गुळवे, पिंटू महाजन यांनी मला काठ्यांनी आमचे आराम करण्याचे रूममध्ये मारहाण करीत आहेत. मी त्याला तुझा मालक विकास लगडे यास फोन करून सांग असे सांगीतले.
दि.०८/०९/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. सुमारास मुलगा सागर यास वेळोवेळी फोन केला असता तो फोन उचलत नव्हता थोडया वेळाने त्याचे सोबत राहणारा ड्रायव्हर निलेश याने फोन उचलला व त्याने मला सांगीतले की, सागर हा झोपलेला आहे. दुपारी १२.०० वा. सुमारास मुलाचा मालक विकास लगडे यांनी मला फोन करून “तुमचा मुलगा सागर यास उलट्या होत आहे, तुम्ही लवकर जळगावला या” असे सांगीतले. त्यानतंर मी नातेवाईका सोबत तात्काळ जळगाव येथे आले. तेव्हा मी विकास लगडे यांना फोन करून कुठे येवू असे विचारले असता त्यांनी मला तुम्ही सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे या असे सांगीतले. त्यानतंर मी सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे जाऊन मुलगा सागर यास पाहिले असता मुलगा हा स्ट्रेचरवर पडलेला होता. त्याचे दोन्ही हाता पायावर, पाठीवर, डोळ्याजवळ मारहाण केल्याचे काळे निळे व्रण व जखमा दिसत होत्या तसेच पायास झालेल्या जखमातुन रक्त निघत होते. तेव्हा आम्हास तेथे उपस्थीत असलेल्या डॉक्टरांनी मुलगा सागर हा मयत झाल्याचे कळविल. दवाखान्यात हजर असतांना मुलाचा मालक विकास लगडे कडून माहिती मिळाली की, पिंटू महाजन याचे मुली सोबत माझा मुलगा सागर का बोलतो याचा राग धरून त्यास निलेश गुळवे, पिंटू महाजन अश्यांनी मुलगा सागर यास विदर्भ रोडलाईन्स, ढोर बाजार मार्केट जळगावचे ऑफिसमध्ये काठ्यांनी मारहाण करून जखमी करून जिवेठार मारले आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी रवाना झाले. तसेच रुग्णालयात येऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. मयत सागर पालवे यांच्या पश्चात आई नीलम, वडील रमेश व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
सदर बाबतीत गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक संदीप गावित, यांनी भेट दिली असून आरोपीच्या गुन्हे शोध पथकाकडून शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here