२७ वर्षीय तरुण ठार एक जखमी घातपाताचा संशय, तपासाला वेग
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉन परिसरात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
मृत तरुणाचे नाव अक्षय संजय देशमुख (वय २७, रा. कांचन नगर, जळगाव) असे असून, गणेश पवार असे जखमी तरुणाचे नाव आहे. गणेश पवार याच्यावर सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हळदीच्या कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय देशमुख आणि गणेश पवार हे दोघे धानोरा येथे मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दोघे दुचाकीने जळगावच्या दिशेने परत येत असताना, रात्री सुमारे साडेअकरा ते बाराच्या दरम्यान कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ हा अपघात घडला.अपघात इतका भीषण होता की अक्षय देशमुख याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार गंभीर जखमी झाला.
नातेवाईकांचा घातपाताचा संशय
या घटनेनंतर मृत अक्षय देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या मते, घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीवरून हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या शरीरावर अपेक्षित तीव्र जखमा दिसत नाहीत, तसेच दुचाकीचेही फार मोठे नुकसान झालेले नाही. या बाबी संशयास्पद असल्याचे सांगत नातेवाईकांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी विविध शक्यता लक्षात घेऊन तपासाची दिशा ठरवली आहे.दरम्यान, परिसरात या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, नेमका अपघात कसा घडला याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.
कुटुंबावर शोककळा
अक्षय देशमुख यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून, तरुण वयातच झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कांचन नगर परिसरात शोककळा पसरली आहे
