१० लाखांचे नुकसान, गायींच्या अन्नटंचाईचे संकट
साईमत/ नशिराबाद/ प्रतिनिधी
नशिराबाद परिसरातील बेळी गावाजवळील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथे असलेल्या सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या अखत्यारीतील भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेत शुक्रवारी दुपारी अचानक भीषण आग लागून मोठे आर्थिक व व्यवस्थापकीय नुकसान झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास चाऱ्याच्या साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गोडाऊनमधून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण करत संपूर्ण गोदामाला आपल्या विळख्यात घेतले. उन्हाचा कडाका आणि वाढलेले तापमान यामुळे आग अधिक वेगाने पसरल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आगीत हजारो क्विंटल चारा जळून पूर्णपणे खाक झाला असून सुमारे १०० आयशर इतका साठा नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत १० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ, गोसेवक आणि संस्थेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. धुराचे लोट, आगीच्या उंच ज्वाळा आणि प्रचंड उष्णतेमुळे काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नशिराबाद नगर परिषदेचे चार अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलातील ललित भोळे आणि दुर्गादास माळी यांनी सहकाऱ्यांसह सतत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच जेसीबीच्या सहाय्याने उरलेला चारा बाहेर काढून आग अधिक पसरू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे आग गोशाळेच्या इतर भागांपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
या गोशाळेत सुमारे ३०० ते ३५० गायींचे पालनपोषण केले जाते. मात्र मोठ्या प्रमाणात चारा नष्ट झाल्यामुळे गोशाळेसमोर आता तातडीचा चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला असून जनावरांच्या संगोपनाबाबत चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर संस्थेने समाजातील नागरिक, गोभक्त, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांना पुढे येऊन चारा व आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. गोसेवेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
