तेलाभिषेक, हवन आणि महाआरतीने शनी मंदिर दुमदुमले
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील प्रसिद्ध शनी मंदिरात शनिवारी शनि जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक विधी, अभिषेक, हवन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
शनि जयंतीच्या औचित्याने मंदिर प्रशासनाने मंदिराची आकर्षक सजावट केली होती. रंगीबेरंगी फुगे, विविधरंगी फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. पहाटेपासूनच मंदिरात पुरोहितांच्या वेदमंत्रांच्या गजरात भगवान शनिदेवांचा विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विशेष महापूजा आणि विश्वशांती व कल्याणासाठी हवनाचे आयोजन करण्यात आले.
शनिदोष निवारणासाठी आणि शनिदेवाची कृपा लाभावी यासाठी अनेक भाविकांनी तेलाचा अभिषेक करून मनोभावे पूजा-अर्चा केली. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिलांसह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण दुपारी ठीक १२ वाजता पार पडलेली भव्य महाआरती ठरली. शनिदेवाच्या जन्मवेळेचे औचित्य साधून मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते शंखनाद आणि घंटानादाच्या गजरात महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी ‘शनिदेव महाराज की जय’च्या घोषणा दिल्याने संपूर्ण सिंधी कॉलनी परिसर दुमदुमून गेला होता. भक्तांच्या जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह संचारला होता.
महाआरतीनंतर मंदिरात आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळपासून सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यात शहरातील विविध भागांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन रांग, सुरक्षा व्यवस्था आणि महाप्रसाद वितरणाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला.
शनि जयंतीनिमित्त सिंधी कॉलनीतील शनी मंदिरात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
