मुंबई : प्रतिनिधी
महाविकासआघाडी सत्तेत असतानाच शिवसेनेत एक असंवादळ आलं, ज्यामुळं पक्ष पुरता हादरला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. पक्षातील एक मोठं नाव, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीनं बंडखोरी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणानं सर्वांच्या नजरा वळवल्या.
पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर मुलाखत दिली. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली.
मातोश्रीशी जोडली गेलेली नाळ असो किंवा वर्षावरील वास्तव्य. इथपासून त्यांनी बंडखोरी झाली, पण नेमकं इथं काय चुकलं? या प्रश्नाचंही उत्तर दिलं. यावेळी चूक आपलीच असल्याचं ते वारंवार म्हणताना दिसले.
गुन्हा माझाच…
‘चूक माझीये. ती मी माझ्या फेसबुल लाईव्हमध्ये कबुलही केली. गुन्हा माझा आहे, तो म्हणजे मी यांना (एकनाथ शिंदे आणि इतर आमदार) कुटुंबातले समजून त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री होणं चुकलं का? असा प्रश्न विचारला असता, त्या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले ‘समजा मी त्यावेळी मी यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर यांनी वेगळं काय केलं असतं? यांची भूकच भागत नाही, यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेना प्रमुख व्हायचंय? शिवसेना प्रमुखांशी स्वत:ची तुलना करताय?’
शिंदे गटाचं नाव न घेता हे वागणं म्हणजे राक्षसी प्रवृत्ती असल्याची सणसणीत टीका ठाकरेंनी केली. महाविकासआघाडीचा प्रयोग चुकला असता, तर नागरिकांनी उठाव केला असता, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत बंडखोरीचा तीव्र शब्दांत निषेध केला.