वाहतूक कोंडीने शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त; वाहतूक विभागाच्या कारवाईकडे लक्ष
साईमत /दिवा/ प्रतिनिधी :
दिवा-आगासन रस्त्यावर बेकायदा पद्धतीने वाहने उभी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा मोठा फटका या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या परिस्थितीमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दिवा-आगासन मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कडेला अनेक वाहनचालक आपली वाहने तासनतास उभी करून इतरत्र निघून जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे समोरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावून काही वेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
यातच काही मोटारसायकल विक्री केंद्रांकडून नवीन दुचाकींचे प्रदर्शन रस्त्याच्या कडेलाच केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या मार्गावर आणखी अडथळे निर्माण होत असून वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे. सार्वजनिक रस्त्याचा अशा प्रकारे वापर होत असताना संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः सकाळच्या वेळेत शाळा व कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर या मार्गावर वाहनांची संख्या वाढते. त्यावेळी बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. कोंडीत अडकलेल्या वाहनांमुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दिवा-आगासन मार्गाची वाहतूक पोलिसांनी तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून बेकायदा पार्किंगविरोधात मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच रस्त्यावरील अनधिकृत वाहन प्रदर्शनावरही नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियमित पाहणी आणि प्रभावी कारवाई करण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
