जुन्या वर्सोवा पुलाची झीज दूर करण्यासाठी २० ते २५ कोटींचा खर्च
साईमत /वसई/ प्रतिनिधी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून, पुलावरील खड्डे बुजविण्यासह खराब झालेले जुने एक्स्पँशन जॉइंट काढून त्यांच्या जागी नवीन स्टीलचे जॉइंट बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या या दुरुस्तीमुळे पुलावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबईसह गुजरात आणि अन्य भागांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल अनेक वर्षे जुना झाल्याने तसेच या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन त्याच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल उभारण्यात आला आहे. नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर जुन्या पुलावरील दोन्ही मार्गिका ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर जुन्या वर्सोवा पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यातच सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे पुलावरील जुने एक्स्पँशन जॉइंट्स खराब झाले होते. काही ठिकाणी ते गंजल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात होती.
ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सुमारे ९०० मीटर लांबीच्या या पुलावर प्रथम खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असून, खराब आणि गंजलेले जुने एक्स्पँशन जॉइंट काढून त्यांच्या जागी नवीन स्टीलचे जॉइंट बसविण्यात येत आहेत. पुलावरून होणाऱ्या मोठ्या वाहतुकीचा भार लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याने पुलाची मजबुती आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. पुलाच्या संरचनेला आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण करून अधिक मजबुती देण्याचे कामही करण्यात येणार आहे.
पुलाच्या बांधकामात एक्स्पँशन जॉइंटला महत्त्वाची भूमिका असते. तापमानातील बदलामुळे उन्हाळ्यात काँक्रीट आणि लोखंड प्रसरण पावते, तर थंड हवामानात त्याचे आकुंचन होते. या नैसर्गिक हालचालींमुळे पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ नये आणि तडे जाण्याचा धोका कमी व्हावा, यासाठी दोन स्लॅबच्या दरम्यान ठरावीक अंतरावर एक्स्पँशन जॉइंट बसविले जातात.
दीर्घकाळ सुरू असलेली वाहनांची वर्दळ, पावसाळ्यातील पाणी आणि बदलते हवामान यामुळे जुन्या पुलावरील एक्स्पँशन जॉइंट खराब झाले होते. त्यामुळे ते काढून त्यांच्या जागी अधिक सक्षम स्टीलचे नवीन जॉइंट बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच पुलाच्या आवश्यक भागांमध्ये काँक्रीटीकरण करून संरचना मजबूत करण्यात येणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या वर्सोवा पुलावरून होणारी वाहतूक अधिक सुरक्षित होण्याबरोबरच वाहनांचा वेग सुरळीत राहण्यास मदत होईल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता असून, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे.
