भट्टीत अचानक स्फोट;या स्फोटात क्रेन चालक भाजला,कामगारांची धावपळ
साईमत /बोईसर / प्रतिनिधी :
तारापूर औद्योगिक वसाहतीतील विराज प्रोफाइल एसएमएस या पोलाद निर्मिती कारखान्यात सोमवारी सकाळी भट्टीमध्ये अचानक झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरून गेला. पोलाद वितळविण्याची प्रक्रिया सुरू असताना झालेल्या या स्फोटात क्रेन चालक धर्मेंद्र कुमार रामअवध शर्मा (४५) भाजले असून त्यांना उपचारासाठी बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजल्याने अनेक कामगारांना कारखान्यातून सुरक्षितपणे बाहेर पडता आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
तारापूर औद्योगिक वसाहतीतील विराज प्रोफाइल एसएमएसच्या प्लांटमध्ये सोमवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता भट्टीमध्ये पोलाद वितळविण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान भट्टीत अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की कारखान्यासह आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे कारखान्यातील कामगारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या कामगारांनी तातडीने कारखान्याबाहेर रस्त्यावर धाव घेतली.
या दुर्घटनेत क्रेन चालक धर्मेंद्र कुमार रामअवध शर्मा हे भाजले. त्यांना तत्काळ बोईसर येथील स्टार लाईट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आणि दुखापतींची तीव्रता याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने कारखान्याच्या इमारतीवरील पत्रे दूरवर फेकले गेले. तसेच शेजारील कारखान्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचेही समोर आले आहे. मात्र, स्फोटाच्या सुमारे दोन मिनिटे आधी कारखान्यात धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजला होता. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या कामगारांना संभाव्य धोका ओळखून बाहेर पडण्याची संधी मिळाली. या वेळी कामगारांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक खबरदारी घेतली. दरम्यान, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी कारखान्याला भेट देऊन स्फोट झालेल्या ठिकाणाची पाहणी केली.
दरम्यान, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली आहे. भट्टीमध्ये स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तांत्रिक बिघाड झाला होता का, तसेच सुरक्षा उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
