धार्मिक प्रवास ठरला अखेरचा; कार अपघातात ठाकूर कुटुंबावर शोककळा
साईमत भुसावळ प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (६०) आणि पाच वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा समावेश आहे. ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या मूळ गावी परतत असताना पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचालक श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या शोभाबाई ठाकूर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पाच वर्षीय शिवन्या हिला बर्हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, परंतु तीही मृत्यूशी झुंज हरली.
या अपघातात जखमी झालेल्या इतर चौघांवर उपचार सुरू असून त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
दर्यापूर शिवारातील गणेश नगर व वरणगाव फॅक्टरी परिसरात या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. ठाकूर कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.
