आधी आजी-आजोबांची हत्या, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; पाच शिक्षकांचा मृत्यू, १५ जण जखमी
साईमत न्यूज नेटवर्क –
बँकॉक : थायलंडमध्ये शाळेच्या परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अवघ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आधी आपल्या आजी-आजोबांची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर शाळेत जाऊन केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच शिक्षकांसह सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडची राजधानी बँकॉकजवळील नॉनथाबुरी प्रांतातील एका शाळेत ही भयंकर घटना घडली. नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने सकाळच्या सुमारास शाळेत प्रवेश केल्यानंतर अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात पाच शिक्षकांसह सात जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आधी घरात केला हल्ला
थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थ्याने शाळेत जाण्यापूर्वी आपल्या आजी-आजोबांवर गोळ्या झाडल्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो शाळेत पोहोचला आणि तेथे गोळीबार करत अनेकांना लक्ष्य केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने वापरलेली ९ एमएमची हँडगन त्याच्या आजोबांची होती. त्याचे आजोबा शिक्षक होते. या शस्त्राचा वापर करून त्याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गोळीबारानंतर शाळेत उडाली भीतीची लाट
स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी आणि शिक्षक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला गोळीबाराचा आवाज फटाक्यांसारखा असल्याचे वाटल्याचे सांगितले. मात्र काही क्षणांतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.
प्रसिद्ध शाळेत घडलेल्या या घटनेमुळे थायलंडमध्ये खळबळ उडाली असून शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसक कृत्य केल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास थायलंड पोलिसांकडून सुरू आहे.
