मेहरूण ३० मीटर रस्ता वाद पेटला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिकेच्या आजच्या महासभेत अपेक्षित चर्चा ऐवजी सत्ताधारी नगरसेवकांमध्येच तीव्र वादंग उसळल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मेहरूण परिसरातील ३० मीटर रस्त्याच्या फेरआखणीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये उघड मतभेद समोर आले.
मेहरूण रस्त्याचा विषय चर्चेसाठी आल्यानंतर हा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने तो तहकूब करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी केली. महापौरांनी या मागणीला सहमती दर्शवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी त्याला जोरदार विरोध केला. या निर्णयावरून “एकतर्फी कारभार सुरू असल्याचा” आरोप करत त्यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
या मुद्द्यावरून दीपक सूर्यवंशी आणि विष्णू भंगाळे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. वातावरण इतके तापले की भंगाळे काही काळ सभागृह सोडून लॉबीपर्यंत गेले. अखेर या विषयावर शिवसेना शिंदे गट तटस्थ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने परिस्थिती काही प्रमाणात शांत झाली.
दरम्यान, अटलांटा महापालिका फसवणूक प्रकरणावरून महासभेत प्रशासनालाही नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महापौर दीपमाला काळे आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना प्रश्न विचारत जाब विचारला. प्रशासनाच्या भूमिकेवरून सभागृहात तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले.
सभेत आणखी एक लक्षवेधी प्रसंग म्हणजे उपमहापौर मनोज चौधरी आणि महापौरांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची. आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी वेळ न मिळाल्याने ते नाराज झाले आणि थेट नगरसेवकांच्या बाकांमध्ये जाऊन त्यांनी स्वच्छता, रस्ते आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्रमकपणे प्रश्न उपस्थित केले. “माझ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाले तर पुढील सभेला येणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील वाढत्या अपघातांचा मुद्दा भाजप नगरसेवक अमर जैन यांनी उपस्थित केला. विविध चौकांतील सर्कल लहान करण्याची गरज त्यांनी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. या चर्चेदरम्यान आयुक्त आणि काही नगरसेवकांमध्येही शाब्दिक खडाजंगी झाली.
विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजप-शिवसेना वाद सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाने काही मुद्द्यांवर भाजपला दिलेले समर्थन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.
दरम्यान, महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी सत्ताधारी आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा करत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आजच्या महासभेतील घडामोडींमुळे महापालिकेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
