सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतच मिळणार अपॉइंटमेंट; वाहनधारकांना RTOचे आवाहन
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेऊन कार्यालयातील विविध सेवांसाठी दिल्या जाणाऱ्या अपॉइंटमेंटच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून आता सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंतच अपॉइंटमेंट दिल्या जाणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून दुपारच्या वेळेत नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वाहनमालक, चालक तसेच अनुज्ञप्तीधारकांना विविध कामांसाठी RTO कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास होऊ नये व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने RTO प्रशासनाने ही उपाययोजना अमलात आणली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी तसेच इतर संबंधित सेवांसाठी आता सुधारित वेळेनुसारच अपॉइंटमेंट देण्यात येणार आहेत. ही नवीन वेळ तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आली असून पुढील परिस्थितीनुसार त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, सर्व वाहनधारक, चालक व अनुज्ञप्तीधारकांनी आपली कामे नियोजित करताना नवीन वेळेची नोंद घ्यावी आणि सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीतच अपॉइंटमेंट निश्चित कराव्यात, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले आहे.
