साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने कोतवालास चिरडून ठार केल्याच्या घटनेचा मलकापूर तालुका कोतवाल संघटनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. कोतवालास ठार मारल्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियावर कारवाई करा, अशा आशयाची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ग्राम कोलद वान येथे १६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार हे तलाठी यांच्यासह अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई करण्यासाठी गेले होते. तेव्हा कोतवाल यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर नेऊन त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा मलकापूर तालुका कोतवाल संघटनेकडून तीव्र निषेध केला आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.