सीसीटीव्हीमुळे हरवलेले सोन्याचे दागिने काही तासांतच परत बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी
रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सुमारे एक तोळा सोन्याचा हार आणि ३ ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या काही वेळात शोधून काढत मूळ मालकाच्या ताब्यात दिल्याची उल्लेखनीय घटना घडली आहे. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी हे भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलने जात असताना त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने रस्त्यात पडून हरवले. काही वेळाने दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे तसेच गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, योगेश माळी, हर्षल पाटील, अक्षय कोतकर, तोसीफ शेख आणि सीमा चौधरी यांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एक रिक्षाचालक रस्त्यावर पडलेले सोन्याचे दागिने उचलताना दिसून आला. या आधारे तांत्रिक तपास व माहिती संकलन करून संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. त्याला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली असता त्याने दागिने सापडल्याची कबुली देत ते पोलिसांच्या ताब्यात दिले.
यानंतर जप्त करण्यात आलेला सोन्याचा हार व कानातील रिंग योग्य ती पडताळणी करून मूळ मालक अशपाक कुरेशी यांच्या ताब्यात देण्यात आले. आपले मौल्यवान दागिने सुरक्षित परत मिळाल्याने कुरेशी यांनी बाजारपेठ पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पोलिसांची तत्पर कार्यवाही यामुळे एक महत्त्वाचा गुन्हेगारी प्रकार टळून हरवलेला मुद्देमाल अल्पावधीतच सुरक्षितपणे मालकाच्या हाती परत देण्यात यश आल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
