साईमत वरणगाव प्रतिनिधी
अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत ३ ब्रास अवैध मुरूम वाहून नेणारा डंपर जप्त केला आहे. भुसावळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळवेल परिसरात एका डंपरमधून अवैधरित्या गौण खनिज मुरूमाची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल पथकाने कारवाईचे नियोजन करून संबंधित वाहनावर नजर ठेवली. त्यानंतर MH.१९.CX.६७११ क्रमांकाचा डंपर अडवून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान डंपरमध्ये सुमारे ३ ब्रास अवैधरित्या उत्खनन केलेले गौण खनिज मुरूम आढळून आले. आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महसूल विभागाने तत्काळ वाहन ताब्यात घेत जप्त केले. या प्रकरणी डंपर चालक सतीश गोपाल कोळी (रा. वझरखेडा) याच्यावर कारवाई करण्यात आली असून डंपर मालक अनिकेत इंगळे (रा. वझरखेडा) असल्याची माहिती समोर आली आहे.
महसूल नियमांनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई भुसावळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे, पोलीस उपनिरीक्षक जैन, तसेच महसूल व पोलीस विभागातील कर्मचारी मनोज म्हस्के, सुधाकर शिंदे, यासीन पिंजारी, प्रशांत ठाकूर आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.
दरम्यान, अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतुकीला कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा कारवायांची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू व गौण खनिज माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
