जामनेर तालुक्यातून नांद्रा प्र.लो.तील स्वामी समर्थ शेतकरी महिला गट प्रथम

0
2

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथील श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गटाने पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून एक लाखाचे बक्षीसही मिळविले आहे. याबद्दल त्यांचा पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथील कार्यक्रमात अभिनेते आमिर खान, किरणराव तसेच पाणी फाउंडेशन चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

नांद्रा गावात दोन महिला गट आणि एक पुरुष गट असे तीन गट होते. तसेच ७८ गट स्पर्धेसाठी होते. गटाच्या माध्यमातून ‘गट शेती साक्षरता’ विषय राबविण्यात आला. गटाने एकत्रित येऊन कृषी निविष्ठांची खरेदी करून तसेच शेतातील कामे एकत्र येऊन करून पैशांची बचत होते. तसेच उत्पादन खर्च कमी होतो. हे स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून दिले. रासायनिक औषधीचा वापर कमी करून जैविक औषधाचा वापर कपाशी पिकावर करण्यात आला. त्यामुळे गटातील खर्च कमी झाला आणि उत्पन्नात वाढ झाली.

जो गट प्रत्येक निर्धारित केलेल्या १४ एसओपीचे पालन करेल तसेच इतर सुधारित पद्धती वापरून शास्त्रोक्त पद्धतीने जो गट काम करेल तो गट बक्षिसास पात्र असेल असे स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेत नेमून दिलेल्या सर्व एसओपीचे पालन करत श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गटाने तालुक्यात प्रथम क्रमांकाने येऊन एक लाखाचे बक्षीस मिळविले. यासाठी त्यांना कृषी कन्या गट व मंगलमूर्ती शेतकरी गट यांचे सहकार्य मिळाले.

माजी सरपंचांच्या आठवणींना मिळाला उजाळा

पाणी फाउंडेशनची गावात सर्वप्रथम उभारणी करणारे आणि गावाचे प्रेरणास्थान असणारे माजी सरपंच दिवंगत डॉ.आधार पाटील यांच्या आठवणींना यानिमित्त उजाळा मिळाला. त्यांच्यामुळेच हा पुरस्कार मिळाला, अशी प्रतिक्रिया विजेत्या महिला शेतकरी गटाच्या सदस्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here