अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन

0
12

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञानासोबतच गणित, इतिहास, भूगोल विषयातील मांडलेल्या उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती.

विज्ञान प्रदर्शनाचे विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, डी.बी.वाल्हे, विज्ञान शिक्षक एन.बी.खंडारे, जी.पी.हडपे, उमेश काटे, दीपककुमार पाटील, नीलिमा पाटील आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात स्मार्ट सिटी, सेंद्रिय शेती, ज्वालामुखी, भूकंप लहरी, सूर्यमाला आदींसह विविध उपकरणांची मांडणी केली होती. शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आठवीची विद्यार्थिनी पल्लवी मोरे आणि इच्छा झाल्टे यांच्या ‘स्मार्ट सिटी’ उपकरणाला प्रथम, सातवीची विद्यार्थिनी देवयानी पाटील हिच्या ‘ज्वालामुखी’ उपकरणाला द्वितीय तर नववीची विद्यार्थिनी मानसी चव्हाण हिच्या उपकरणाचा तृतीय क्रमांक आला. यावेळी परीक्षक म्हणून उमेश काटे आणि जी.पी.हडपे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी दिलीप मनोरे, प्रवीण उशीर, सुरेश पाटील आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन दीपककुमार पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here