‘चोपडा टॅलेंट हंट’ परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील ‘चोपडा टॅलेंट हंट’ आयोजन समितीमार्फत आयोजित ‘चोपडा टॅलेंट हंट’ म्हणजेच ‘सीटीएच’ परीक्षेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पहिली, चवथी आणि सातवीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तब्बल १ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही परीक्षा ४ फेब्रुवारी रोजी पंकज विद्यालय याठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच सीबीएसई माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला. परीक्षेसाठी मोठी आकर्षक बक्षिसे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा युगाची ओढ लागणे तसेच स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज करणे होय. परीक्षा स्थळी पंकज ग्लोबल पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक मिलिंद पाटील आणि विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अनेक शिक्षक, पालक तसेच चोपडा शहर आणि तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी परीक्षा स्थळी येऊन नियोजनात भाग घेतला. पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने परीक्षेसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देऊन मोठे योगदान गुणवत्तापूर्ण सामाजिक कार्यात केले. यशस्वीतेसाठी आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक पद्माकर पाटील, गुरु क्लासेसचे संचालक अश्‍विनी कुमार चौधरी, समर्थ मॅथ्स अँड सायन्स अकॅडमीचे संचालक घनश्‍याम पाटील, विशाल मराठे यांनी परिश्रम घेतले. परीक्षेच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here