धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची भारतीय नौदलात निवड

0
3

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

येथील धनाजी नाना महाविद्यालयातील दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीचा विद्यार्थी महेंद्र भोई याची भारतीय नौदलात स्किल टेक्निशियन म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्याचा प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

रावेर तालुक्यातील गाते येथील मधुकर विठ्ठल भोई व आई यशोदाबाई यांचा महेंद्र हा चिरंजीव आहे. आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे, कामाला जावे लागत होते. म्हणून तीन वेळा १२ वी नापास होऊन चौथ्या वर्षी पास झाल्यावर पुढे काय करावे सुचत नव्हते. बी.ए.ला धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर कळले की, येथे दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनी आहे. त्यात असंख्य मुले रोज अभ्यास करतात. हे एक उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. त्याचवेळी संचालक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. जाधव यांना भेटल्यावर त्यांनी आयुष्याला वेगळी दिशा दिली. दहा रुपयात शिव भोजन थाळी घेवून उदरनिर्वाह केला. सतत दोन वर्ष रात्री काम करून दिवसा महाविद्यालयातील प्रबोधिनीच्या अभ्यासिकेत अभ्यास केला.

प्रबोधिनीत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी येणारे वक्ते, सावदा शहराचे ए.पी.आय.वाघ, सिनियर रविना सपकाळे, मुकुंदा बाविस्कर यांच्यामुळे उत्तर लिहिण्याची कला समजली. मैदानी स्पर्धेसाठी डॉ.गोविंद मारतळे आणि सिनियर मुलांचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व फक्त महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली अभ्यासिका भव्य मैदान, महागडे पुस्तके यामुळे खूप छान सोय झाली. अशा सुविधा मिळाल्या नसत्या तर कदाचित यशही मिळू शकले नसते. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.शिरीष चौधरी, व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य आर.बी. वाघुळदे, प्रबोधिनीचे संचालक डॉ.एस.व्ही जाधव यांचे त्याने आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here