निवडणूक काळात ६६ पथकांची तैनाती
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पावले उचलली आहेत. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा नियमभंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
या कक्षाचे नेतृत्व अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून, निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी थेट तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात व्यापक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये ३३ व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके आणि ३३ फ्लाइंग स्क्वॉड पथकांचा समावेश असून ही पथके सतत क्षेत्रीय पातळीवर देखरेख ठेवणार आहेत. संशयास्पद हालचाली, बेकायदेशीर प्रचार, मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न किंवा आर्थिक प्रलोभने यावर विशेष नजर ठेवली जाणार आहे.
अनधिकृत जाहिरातबाजी, परवानगीशिवाय प्रचार साहित्याचा वापर तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्या सर्व प्रकारांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ०२५७-२२२०६०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा adcjalgaon@gmail.com या ई-मेलवर माहिती पाठवता येईल, असे आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी स्पष्ट केले आहे.
एकूण ६६ विशेष पथकांच्या मदतीने प्रशासनाने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था आणि आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्जता दर्शवली असून, नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
