नवविवाहित तहसील कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
साईमत/फैजपूर (ता. यावल)/ प्रतिनिधी
येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शासकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर राजेंद्र तेली (वय ३५) हे यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कारकून म्हणून कार्यरत होते. ते फैजपूर येथील सराफ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. बुधवार, १७ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजता त्यांनी आपल्या घरातील छताच्या पंख्याच्या हुकाला सूती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच शेजारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाल्याची माहिती समोर आल्याने या घटनेने अधिकच हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी यावल ग्रामीण रुग्णालयात येथे हलविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती गुणवंत दिलीप तेली यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात येथे दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
