मैत्रीतील वाद पोहोचला टोकाला; वर्गमित्रानेच विद्यार्थ्यावर केला हल्ला
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील आयोध्यानगर परिसरात शुक्रवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाचे गंभीर स्वरूप धारण झाल्याची घटना समोर आली आहे. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या बरगडीजवळ गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आयोध्यानगर परिसरातील एका शाळेजवळ शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या बरगडीजवळ गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांमध्येच अशा प्रकारे धारदार शस्त्राचा वापर झाल्याने पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली असून, घटनेची सखोल चौकशी करून हल्ला करणाऱ्या संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. घटनेचे नेमके कारण, हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि वादाची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या फुटेजच्या आधारे हल्ल्याची नेमकी घटना कशी घडली, त्यावेळी कोण कोण उपस्थित होते आणि हल्ल्यासाठी धारदार शस्त्र कोठून आणण्यात आले, याचा तपास केला जाणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमधील वाद इतका टोकाला गेल्याने या घटनेने विद्यार्थी सुरक्षा आणि शाळेच्या परिसरातील देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
