धक्कादायक प्रकार अंतिम सामन्यात थेट मैदानावर नांगर फिरवल
साईमत धरणगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सुरू असलेल्या ‘जळगाव ग्रामीण आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेला रविवारी अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक वळण लागले. अंतिम सामना सुरू असताना अचानक एका व्यक्तीने ट्रॅक्टर घेऊन थेट मैदानात प्रवेश केला आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळपट्टीवर नांगर फिरवून संपूर्ण सामना विस्कळीत केला. या घटनेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू होता. खेळाडू विजयासाठी पूर्ण ताकदीने झुंज देत होते, तर प्रेक्षक उत्साहात सामना अनुभवत होते. मात्र काही क्षणांतच एका ट्रॅक्टरने मैदानात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला ही सामान्य हालचाल असल्याचे वाटले, मात्र चालकाने थेट खेळपट्टीच्या मध्यभागी ट्रॅक्टर नेऊन नांगरणी सुरू केल्याने सर्वच जण थक्क झाले.
काही मिनिटांतच संपूर्ण खेळपट्टी पूर्णपणे उध्वस्त झाली. त्यामुळे सुरू असलेला अंतिम सामना तातडीने थांबवावा लागला आणि अखेर आयोजकांनी तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरातील मेहनतीने तयार केलेली खेळपट्टी डोळ्यादेखत नष्ट झाल्याने खेळाडूंमध्ये मोठा संताप उसळला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या क्रीडा स्पर्धेसाठी स्थानिक पातळीवरील एका राजकीय पदाधिकाऱ्याला निमंत्रण देण्यात आले नव्हते. याच कारणातून संबंधित पदाधिकाऱ्याच्या समर्थकाने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा मैदानात सुरू होती. मात्र या घटनेबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, या प्रकारानंतर मैदानावर उपस्थित खेळाडू आणि ट्रॅक्टर आणणाऱ्या गटामध्ये बाचाबाची झाल्याची माहितीही समोर आली आहे. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून “हा क्रिकेटचा अपमान आहे” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. क्रीडास्पर्धेसारख्या उपक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे आयोजकांनीही तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
