धरणगाव तालुक्यातील नांदेड परिसरातील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवाचे प्राण वाचले
साईमत /धरणगाव /प्रतिनिधी :
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाची तत्परता किती महत्त्वाची असते, याचा प्रत्यय धरणगाव तालुक्यातील नांदेड गावाजवळ आला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरिणाला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले.
नांदेड गावाच्या शिवारातील एका शेत परिसरात हरिण जखमी अवस्थेत आढळून आले. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे हरिणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक चांगो गोमा भील यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सरोज डी. पाटील यांना दिली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.
माहिती मिळताच वनपाल सतीश जी. ठेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पथकाने कोणताही विलंब न करता जखमी हरिणाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. प्राथमिक उपचार करून त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी वनविभागाच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.
वेळेत मदत मिळाल्याने हरिणाची प्रकृती सुधारण्यास मदत झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि नागरिकांनी दाखविलेली संवेदनशीलता यामुळे एका निष्पाप वन्यजीवाचा जीव वाचला.
वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बचाव कार्यात वनपाल सतीश जी. ठेलार, सुनील थोराकर आणि वनरक्षक शांताराम पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच जखमी हरिणाची माहिती वेळेत देणारे चांगो गोमा भील आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सरोज डी. पाटील यांच्या तत्परतेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
