घरावर डल्ला, देवघरही फोडले चांदीच्या देवमूर्ती, सोन्याची चैन अन् रोकड लंपास
साईमत /धरणगाव/प्रतिनिधी
शहरातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घरावर डल्ला मारत मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत परिसरातील रहिवासी नाना महादू वारुळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी संधी साधून प्रवेश केला. घरातील साहित्याची उलथापालथ करत चोरट्यांनी चांदीच्या देवमूर्ती, सोन्याची चैन तसेच अंदाजे दहा ते बारा हजार रुपयांची रोकड हातोहात लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच वारुळे कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
अलीकडील काळात शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस तसेच निर्जन भागात पोलिसांची गस्त अपुरी पडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार घडणाऱ्या घरफोड्यांमुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याची चर्चा शहरात सुरू असून, संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली असून, आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि प्रमुख चौक तसेच वसाहतींमध्ये अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे धरणगावकरांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक गडद झाली आहे.
