गेट उघडण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण करून शर्ट फाडला
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेले गेट तातडीने उघडण्याच्या मागणीवरून म्हसावद येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमांचे पालन करत गेट न उघडल्याचा राग अनावर झालेल्या एका वाहनचालकाने रेल्वे गेटमनला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी घडली. या प्रकारामुळे रेल्वे गेट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
म्हसावद येथील रेल्वे गेटवर प्रवीण रामलाल महे हे कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. रेल्वे येण्याच्या वेळेत सुरक्षेच्या कारणास्तव गेट बंद ठेवण्यात आले होते. यावेळी एका वाहनचालकाने गेट उघडण्याची मागणी केली. मात्र, रेल्वे नियमांनुसार गेट उघडणे शक्य नसल्याचे महे यांनी सांगितले.
यावरून संबंधित वाहनचालक आणि गेटमन यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद चिघळला आणि वाहनचालकाने संतापाच्या भरात प्रवीण महे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या अंगावरील शर्ट फाटला असून, त्यांना दुखापत झाली.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी गेटमनवर उपचार करण्यात आले असून, घटनेची माहिती रेल्वे प्रशासन तसेच पोलिसांना देण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे गेटमन हे प्रवाशांच्या आणि रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर झालेला हल्ला गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे कर्मचारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
