साईमत लाईव्ह
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात राजकीय नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. त्यामुळे महविकास आघाडी सरकार कोसळले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आमदारांना केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.
राज्यातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा. सध्या तरी विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदासंघात जास्तीत जास्त वेळ द्या, त्याठिकाणी जनतेच्या समस्यांचे निराकरण करा, त्यांचे प्रश्न समजून घ्या, असे पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हणाले आहेत. तसेच शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. हे पाहता सरकार पडले तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागण्याचे आदेश पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या नव्या सरकारचं पहिलं दोन दिवसीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारची उद्या बहुमत चाचणी होणार आहे.