साईमत चोपडा प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याया आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने पोक्सो व इतर विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली आहे. दीपक रविन्द्र भिल (रा. अकुलखेडा , ता.चोपडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेत पिडीत मुलीच्या आईने 5 फेब्रुवारी, 2020 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला (गुरन. 25/20) भा.दं.वि. 363 कलमानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आरोपी दीपक भिल 17 फेब्रुवारीरोजी देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे पोलिसांना पिडीत मुलीसोबत मिळून आला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या जवाबानुसार त्याच्याविरुद्ध या गुन्हयात भादंवि. 376 (1) (ए), 376 (3) सह बालकांचे लैंगिक गुन्हयापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी दिपक भिल यास अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांनी पुर्ण करुन आरोपीविरुध्द अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. तपासातील सबळ पुरावे उपलब्ध करुन अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आरोपी दीपक द्र भिल यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी भादंवी कलम 363 अन्वये 7 वर्ष कैद, पोक्सो कलम 4 मध्ये 20 वर्षे कैद, पोक्सो कलम 8 मध्ये 3 वर्ष कैद अशी शिक्षा सुनावली. गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांना पोहेकॉ प्रदीप राजपुत, पो.ना. जयदिप राजपुत, पो.ना. मधुकर पवार आदींनी मदत केली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एस. आर. पाटील यांनी तर पोका नितिन कापडणे यांनी केसवॉच म्हणून काम पाहीले.