दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार – आ. बच्चू कडू

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची ग्वाही ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.

महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, दिव्यांग अधिकारी भरत चौधरी, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, संभाजी सोनवणे आदींची उपस्थिती होती.

आमदार बच्चू कडू म्हणाले, जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात होत आहे.याचा मनस्वी आनंद आहे. पूर्वी दिव्यांगाच्या पाच टक्के राखीव निधी खर्चासाठी आंदोलन करावे लागत होते. आज शासन स्वतः दिव्यांग अभियान राबवित आहे. ज्याला दोन पायी नाहीत त्यांना सशक्त माणसांसोबत लढावे लागते. मूकबधीर बांधवांला अनेक अडचणी आहेत. दहावीनंतर शिक्षणासाठी फक्त चार शाळा आहेत‌. अंधांना अनेक अडचणी आहेत. त्यांचा अभ्यास असला तरी परिक्षेसाठी लेखनिक भेटत नाही. अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे. त्यांची निश्चितच प्रशंसा होणार आहे. दिव्यांगासाठी आपल्याला प्रचंड काम उभे करायचे आहे. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला थेट पगार मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा चालू आहे.
राज्यात तीन कोटी दिव्यांग बांधव आहेत. तकालानुरूप दिव्यांगासाठी पारंपरिक सायकली वाटप न करता आत ई-सायकली वाटप करण्याची गरज आहे. गावातील चांगल्या लोकांनी एकत्र येत दिव्यांगाचे उद्योग स्थापन व्हावेत यासाठी बचतगट तयार केले पाहिजेत. असे आवाहन ही श्री कडू यांनी केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील दिव्यांगांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे‌.
आपल्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की, एडीआयपी या योजनेंतर्गत आतापर्यंत ५००० दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुरूप अडीच कोटी रूपयांच्या साहित्य साधने व उपकरणांचे वितरण करण्यात आले आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी ही मिळाली.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या २५ मदत कक्षांची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार धर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था आदींच्या मदत कक्ष – स्टॉल्सचा समावेश होतो. या कक्षांच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली. योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात आली. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग सघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार आमदार राजूमामा भोळे यांनी मानले‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here