विव्हळणारा कुत्रा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी
पशुसंवर्धन उपायुक्तांना बोलावले
जळगाव (प्रतिनिधी)
–जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर इजा झालेली होती. संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले.
जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले त्यांनी जखमी कुत्र्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले.
माणसाने मुक्या जीवांचीही काळजी घ्यावी, या तत्त्वावर विश्वास ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत तहानलेली पाखरे पाण्यासाठी तडफडू नयेत म्हणून कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या.
याच उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या कक्षासमोरील कुंडीत पाणी टाकून केली.