साने गुरूजींच्या पुस्तकांचा इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावा

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

‘श्‍यामची आई’ पुस्तकाचा १३ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच त्याचा जपानी, चीनी व इंग्रजीत अनुवाद केला आहे. त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे. याकरीता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा साने गुरूजी यांची पुतणी सुधा साने यांनी व्यक्त केली. साने गुरूजींचे १२५ जन्म शताब्धी वर्ष आहे. त्यांच्या साहित्यांची खुप गरज आहे. येणाऱ्या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. गुरूजींच्या मृत्यूला ७५ वर्ष पूर्ण होत आली आहेत. परंतु, आजही खान्देशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना सुधा साने यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, १९२३ मध्ये जुलै महिन्यात गुरूजींनी अमळनेरच्या मातीत पहिले पाऊल टाकले. ते खान्देशाच्या मातीत एकरूप झाले. त्यांनी कामगारांना न्याय मिळावा म्हणून लढे उभारले. त्यांनी ५० वर्षांच्या आयुष्यातील साडे आठ वर्ष तुरुंगात काढले. तसेच साहित्याचे विविध प्रकार हाताळले. त्यांनी १९२४ मध्ये प्रथम पुस्तक लिहिले. तसेच १०० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या कर्मभूमीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, त्याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या कामांची दखल घेतल्याने त्यांचा गौरव झाल्याचे समजते, असेही त्या म्हणाल्या.

अलक्षित साने गुरूजी परिसंवादातून उलगडले विविध पैलू

अलक्षित साने गुरूजी परिसंवादात पूज्य साने गुरुजी यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंचा समग्र विचारमंथन करण्यात आला. त्यात प्रामुख्याने साने गुरूजी यांनी नेहमीच मातृहृदयी लेखक म्हणून ओळखले जाते. परंतु, त्यांची ओळख तेवढीच नव्हती ते समाज सुधारक, कामगार नेते, विचारवंत, स्त्री आणि दलितांसाठी चळवळ उभारणारे नेते म्हणून पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.

डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी साने गुरूजी यांच्याकडे साधन नसतानाही वेगवेगळे कार्य सिध्दीस नेले असल्याचे सांगितले. गुरूजी हे वेद व वेदाचे ज्ञाता होते. मरणोप्रांत जीवनाचे उत्तम उदाहरण साने गुरूजी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. ललित अधाने म्हणाले की, साने गुरुजी यांना असामान्य व्यक्तीमत्त्व लाभले होते. ते सर्व पिढीचे आवडते लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे यांनी गुरूजींना संत परंपरेतील साहित्य म्हणून गौरविले असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरूजींने जे अनुभवले तेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रा. लक्ष्मण सोनवणे म्हणाले की, साने गुरूजी यांचे जीवन एक कोडे बनले आहे. गुरूजी लेखक, विचावंत, स्वातंत्र्यवीर, कामगार नेते अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. येरवडा कारागृहात असताना त्यांची आचार्य विनोबा भावे यांची भेट झाली होती. त्यातून त्यांना सामाजिक कार्यांची प्रेरणा मिळाली. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकतेसाठी १९३७ मध्ये ‘सोन्या मारोती’ नावाची कांदबरी लिहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. परमानंद बावनकुळे म्हणाले की, साने गुरूजी यांनी शिक्षण पेशाचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आहे. त्यात त्यांनी लेखक, संत, स्वातंत्र्य सेना म्हणून कार्य केले. परंतू, त्यांच्यातील लेखकाने संत, स्वातंत्र्य सेनानी हे पैलू दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांनी सामाजिक कार्य करतांना दुसऱ्यांचे अंधानुकरण केले नाही. जगातील चांगले साहित्य मराठी अनुवादीत करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यांनी बहुजन, पीडित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण केले होते. त्यांनी निर्भिडपणे नेतृत्व केले.

प्रकाश पाठक यांनी गुरूजींनी मातृधर्माला कुटूंब धर्माची जोड दिली. ‘वसुंधरा कुटूंब कल्याण’नुसार त्यांनी संपूर्ण जगावर प्रेम केले. सामाजिक जीवन ममत्त्वाने जोडले पाहिजे. त्यांनी त्यांचे जीवन समता, स्वातंत्र्य, बंधूता यांनी जोडले आहे. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांचा हा गुण दुर्लक्षित झाला आहे.

अध्यक्ष चैत्रा रेडकर यांनी साने गुरूजी यांच्या ‘श्‍यामची आई’ सोबत त्यांच्या ‘सोन्या मारोती’, ‘संध्या’, ‘सुधास पत्र’ यांचेही वाचन केले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. गुरूजी निर्भय आणि करारी होते. त्यांनी कागमारांचे आंदोलन केले. ‘आता पेटवू सारे रान’ असे म्हणत शेतकऱ्यांसाठी लढा उभारला. जगण्यात करुणा नसेल तर धर्म अभिव्यक्तीसाठी मानावा का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here