“कर भरायचा नागरिकांनी आणि बदल्यात खड्डे सहन करायचे?”; संतप्त नागरिकांचा सवाल
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, या प्रश्नाकडे महानगरपालिकेचे होत असलेले दुर्लक्ष आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. परिसरातील रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जात असताना सुप्रीम कॉलनी परिसर मात्र आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः सुप्रीम कॉलनी रिक्षा स्टॉप ते सागर अपार्टमेंट तसेच सागर अपार्टमेंट (गीतांजली केमिकल) ते कृष्णानगर मागील परिसर या मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी या रस्त्यांवर केवळ खडी टाकून कच्च्या स्वरूपात काम करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत ना डांबरीकरण करण्यात आले, ना मजबुतीकरणाची कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळीचे लोट उडत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. “रस्ता, स्वच्छता आणि सुरक्षित प्रवास या मूलभूत सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नियमित कर भरूनही नागरिकांना खड्डे, धूळ आणि असुविधाच मिळत असतील, तर हा कसला विकास?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.
या भागात औद्योगिक वसाहतीत काम करणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. दैनंदिन कामाच्या व्यापामुळे अनेकांना महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे शक्य होत नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
शहर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना शहराच्या उपनगरांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. विकास हा केवळ मध्यवर्ती भागापुरता मर्यादित न राहता शहरातील प्रत्येक भागापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून आवश्यक विकासकामे हाती घ्यावीत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशारा मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी दिला.
यावेळी मनसेचे उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भील, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, राजेश मराठे, बादशहा शहा यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
