साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलेले असतानाही येथील शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस आपल्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधांपासून अद्यापही दूर आहे. रस्ते नाहीत, पाणी नाही, पिकाला भाव नाही, शेती पीक विम्याचा मोबदला नाही. एकूणच चोपडा तालुका हा राजकीय अनास्थेचा बळी ठरला असल्याचे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच रहिवाश्यांना आता न्याय मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या चोपडा येथील गौतम नगर या अतिक्रमित जागेच्या प्रश्नावर भेट देण्यासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, अतिक्रमण कोणत्याही जागेवर असो ते तात्काळ काढता येत नाही. त्याला कायद्याने पंधरा दिवसांच्या अंतराने तीन नोटीसा दिल्या पाहिजेत. ४५ दिवसांचा अवधी तेथील रहिवाशांना दिला पाहिजे. गौतम नगर भागात राहणाऱ्या लोकांची आज तिसरी पिढी तिथे राहत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणणाऱ्यांना आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत, जागेवर जावून रहिवास्यांशी बोलून पुढचा निर्णय जाहीर करू, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी गौतमनगर येथे प्रत्यक्ष जावून तेथे पाहणी करीता तेथील रहिवाश्यांशी बोलणे केले. त्यानंतर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच याबाबत न्यायालयीन लढाई लढल्या जाईल, असे सांगितले. गरज पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अशोक बाविस्कर, डॉ.नवल मराठे, गोपाळ सोनवणे, समाधान सोनवणे, राजेंद्र बाविस्कर, संतोष अहिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते. समस्येबाबत चोपडा विधानसभेच्या आ.लता सोनवणे यांनाही यासंदर्भात २६ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले. त्यात बेघर होण्यापासून वाचवावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतांना प्रभाकर सोनवणे, विकी शिरसाट, सुधाकर सोनवणे, राहुल सपकाळे, मोहन सोनवणे, संदीप मैराळै, विजय वानखेडे, लखन सपकाळे, पंकज बाविस्कर, समाधान पवार, महेंद्र बाविस्कर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग उपस्थित होते.