साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांवर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांची तुलना पालापाचोळ्याशी केली आहे. गेला तो पालापाचोळा आहे. तो उडून गेल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोजक्या शब्दात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. लक्षात ठेवा, याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांना आजच्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील पालापाचोळा या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना आणखी काही बोलायचं ते बोलून होऊ द्या. मग एकत्रितपणे उत्तर देऊ. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे. तर या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे हे आधी लक्षात ठेवा. इतिहास घडवणारे कोण असतात हे जनतेने बघितले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही. बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाला पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचे ते म्हणू द्या. तो त्यांचा विचार आहे. परंतु, पुन्हा एकदा सांगतो याच पालापाचोळयाने इतिहास घडवलेला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.