पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग; महापालिकेचा निर्णय
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून शहरातील विविध प्रभागांमधील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार असून, यासाठी प्राधान्यक्रमानुसार रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही कामे उद्या, मंगळवार दि. २६ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने ही कामे तातडीने हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ही दुरुस्ती मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिकेच्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ आणि १९ मधील अनेक प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात के.सी. पार्क अंतर्गत रस्ते, इंद्रप्रस्थ नगर, बहिणाबाई नगर, शिवाजी नगर उड्डाणपुलाखालील रस्ता, प्रशांत चौक ते उज्ज्वल चौक मार्ग, बजरंग बोगदा परिसर, महादेव मंदिर ते स्मशानभूमी रस्ता, सुप्रीम कॉलनीतील अंतर्गत रस्ते, तसेच एम.जे. कॉलेज ते प्रभात चौक हा महत्त्वाचा मार्ग यांचा समावेश आहे.
याशिवाय मेहरूण पिंप्राळा शिव रोड, मोहोडी रोड, शामा फायर ते महादेव मंदिर मार्ग, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, आझाद रोड, कालंकामाता मंदिर परिसर, गणेशवाडी तसेच रिंग रोड परिसरातील काही भागांतील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनाही वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, लवकरात लवकर काम पूर्ण करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
