तरुणाच्या खूनप्रकरणी नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव) या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना २२ मे रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली होती. यामुळे नातेवाईकांनी गुरुवारी, २३ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी शनीपेठ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

किशोर सोनवणे हा बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ येथे परिवारासह वास्तव्याला आहे. किशोरचा काही जणांसोबत जुना वाद होता. त्या जुन्या वादातून २२ मे रोजी रात्री हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनांसाठी धाव घेतली.

परिसरात तणावाचे वातावरण

जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कुटुंबीयांसह इतर नातेवाईकांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याने नातेवाईकांची प्रचंड प्रमाणावर आंदोलनस्थळी गर्दी दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here