शिरसोलीला भरदिवसा चोरट्यांनी तलाठ्याचे बंद घर फोडले

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील शिरसोली येथे राहणाऱ्या तथा कानळदा येथे तलाठी असणाऱ्या व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. चोरट्यांनी ५ तोळे सोन्यासह ५० हजारांची लांबविले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी आकाश विजय काळे (वय २८, रा. अशोक नगर, शिरसोली प्र. न., ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

शिरसोली येथे आकाश काळे हे आईसह राहतात. त्यांची आई सध्या देवदर्शनासाठी उत्तर भारतात गेल्या आहेत. आकाश काळे हे कानळदा येथे तलाठी आहे. २२ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी ड्युटीवर जाण्यासाठी घर बंद करून शिरसोलीतून कानळदा येथे गेले. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांचा मेसचा डबा देण्यासाठी महिला त्यांच्या घरी गेली होती. तेव्हा तिला घर उघडे दिसले. त्या महिलेने आकाश काळे यांना फोन करून घर उघडे असल्याबाबत माहिती दिली. त्यामुळे आकाश काळे हे तात्काळ शिरसोली येथे आले. तेव्हा त्यांना घरात कपाट उघडे दिसले. कडी कोयंडा तोडलेला दिसून आले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिरसोलीचे कोतवाल मयूर मराठे, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.

श्‍वानपथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण

आकाश काळे यांच्या घरातून ५ तोळे सोने व ५० हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे दिसून आले आहे. जळगावहून श्‍वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, पो.हे.कॉ. जितेंद्र राठोड आदींनी भेट दिली. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या एकाला शेजारील महिलेने पाहिल्याची माहिती मिळाली. दोन जण घरात असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here