साईमत, रावेर : प्रतिनिधी
तालुक्याला सहा महिन्यानंतर रेशनद्वारे वितरीत होणारी साखर प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा गुढीपाडवा सण गोड होणार आहे.साखर प्राप्त झाल्याची माहिती मिळताच गरजू जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.
मागीलवर्षी ऑक्टोबरपासून अंत्योदय रेशनकार्ड धारकांना साखर मिळाली नव्हती. त्यामुळे गरजू कुटुंबाच्या ताटातून गोडवा रुसला होता. वरिष्ठ स्तरावरुन साखर प्राप्त होत नसल्याने तालुकास्तरावर साखर मिळत नव्हती. अखेर तहसीलदार बंडू कापसे व पुरवठा निरीक्षक डी.के.पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नामुळे आता तीन महिन्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची साखर रावेर गोडाऊनवर प्राप्त झाली आहे. अजुन यावर्षीची जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची साखर यायची बाकी आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या साखरेमुळे गरजू जनतेच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.