फैजपुरातील बैठकीत दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची माहिती
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी:
यावल आणि रावेर तालुक्यातील वारकरी परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या वै. डिगंबर महाराज चिनावळकर यांच्या आषाढी पायी दिंडीचे येत्या ६ जून रोजी खानापूर येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. यासंदर्भात फैजपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नरेंद्र नारखेडे होते. यावेळी दिंडी परंपरेचे अधिपती दुर्गादास महाराज नेहते होते. बैठकीत दिंडीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष घनश्याम भंगाळे, सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले, विश्वस्त जयराम पाटील, शरद महाजन, धनंजय चौधरी, विजय महाजन, रमेश महाजन, टेनूदास फेगडे, भास्कर बांडे, अतुल तळेले, ललिता महाजन, आशाबाई तळले यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधांवर बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. प्रवासादरम्यान आवश्यक वाहने सोबत असतील आणि मुक्कामाची व्यवस्था डिगंबर महाराज मठात करण्यात येणार असल्याचे ठरले. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे. ही दिंडी खानापूर येथून निघून चिनावल येथील डिगंबर महाराज समाधी स्थळी अभिषेक व भजनाने प्रारंभ करेल. त्यानंतर रोझोदा, खिरोडा, कलमोडा, बोरखेडा, हंबर्डी, भुसावळ, खडका, जामनेर, सिल्लोड, भोकरदन, जालना, बीड, बार्शी अशा विविध ठिकाणी मुक्काम करत ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करून २३ दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे.
दिंडीची परंपरा कायम
दिंडीची परंपरा वै. डिगंबर महाराज चिनावळकर यांनी सुरू केली होती.त्यानंतर विठ्ठल महाराज, हंबर्डीकर आणि वै. अरुण महाराज, बोरखेडेकर यांनी पुढे सुरु ठेवली आहे. विणेकरी भगवंत महाराज चौधरी (खानापूरकर) यांचे परंपरेच्या पुनर्स्थापनेत सहकार्य लाभले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी ५ जून रोजी सायंकाळपर्यंत खानापूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, विणेकरी भगवंत महाराज चौधरी यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, एन.पी.चौधरी, राजेंद्र मानेकर, राजू मिस्त्री, शेखर चौधरी, भूषण नारखेडे, युवराज चोपडे, किरण चौधरी आदींनी परिश्रम घेतले.