साईमत, रावेर : प्रतिनिधी
येथील पोलीस स्टेशनला सिनियर पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पद रिक्त असल्याने सह पोलीस निरीक्षक सतीष अडसुर यांच्याकडे प्रभारी चार्ज होता.
जिल्ह्यात सर्वात सिनियर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी अखेर पदभार घेतला आहे. अनेक दिवसांपासून रावेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कोण येणार? त्याची चर्चा आणि उत्सुकता लागून होती. मागील अडीच महिन्यांपासून येथील पद रिक्त असल्याने सहायक पोलीस निरीक्षक सतिष अडसुर प्रभारी अधिकारी म्हणून रावेर पोलीस स्टेशनचा कारभार पाहत होते. अखेर सिनियर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. श्री.ठाकुर यांची तब्बल ३१ वर्ष सेवा झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातही बराच काळ त्यांनी सेवा दिली आहे. त्यामध्ये जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन, पारोळा पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशनसह खामगाव, अमरावती, मलकापूर, यवतमाळ सारख्या जिल्ह्यातही त्यांनी सेवा बजावली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे यावरच आपला जास्त भर असणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.