फसवणूक प्रकरणी अमरावतीतून दुसऱ्या आरोपीला अटक

0
2

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

कृषी महामंडळ अथवा जळगाव जिल्हा दूध संघात नोकरी लाऊन देण्याच्या आमिषातून तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला मुक्ताईनगर पोलिसांनी अमरावती येथून ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक सचिन वानखेडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.

सविस्तर असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी असलेल्या फकीरा अर्जुन सावकारे (वय २५) या तरूणाने अलीकडेच मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार, संबंधित तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय ओळखी असल्याचे सांगितले. आपण तुला कृषी उद्योग विकास महामंडळ अथवा जिल्हा दूध संघात नोकरी लाऊन देऊ. मात्र, यासाठी पैसे द्यावे लागतील, असे आमिष त्यांनी दाखविले. यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊनही प्रत्यक्षात मात्र त्याने नोकरी लाऊन दिली नाही. या प्रकरणात फकीरा सावकारे यांची सुमारे साडे तेरा लाख रूपयात फसवणूक झाली. या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

दरम्यान, याच प्रकरणात आता डीवायएसपी राजकुमार शिंदे आणि पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, हवालदार रवींद्र धनगर, माधव गोरेवार, दिगंबर कोळी या पोलीस पथकाने अमरावती येथून ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक सचिन रमेश वानखेडे याला अटक केली आहे. या व्यक्तीने दूध संघातील परीक्षा प्रक्रिया राबविली आहे. त्याचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्याने त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात आता दुसऱ्या संशयिताला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात अजून काही समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here