खडकपाडा परिसरात रात्री झोपेत असताना हल्ला; आरोपी मामा पोलिसांच्या ताब्यात
साईमत / कल्याण
कल्याण शहरात मोबाईलवरील लुडो गेमवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण घटनेत झाले असून अल्पवयीन मामाने आपल्या भाच्याची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव गोकुळ नेपाळी असे असून तो आपल्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये वास्तव्यास होता. प्राथमिक माहितीनुसार, गोकुळ आणि त्याचा अल्पवयीन मामा यांच्यात मोबाईलवर लुडो गेम खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून दोघांमध्ये तीव्र बाचाबाची झाली होती.
घटनेच्या रात्री गोकुळ झोपेत असताना, अल्पवयीन मामाने त्याच्यावर धारदार चाकूने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गोकुळ गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घरातील सदस्यांना प्रकार लक्षात येताच गोंधळ उडाला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करून घटनास्थळाची पाहणी करत महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
