साईमत न्यूज नेटवर्क –
पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही घटना पोलिस चौकीसमोरच घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर अंधाधुंद गोळ्या झाडून पळ काढला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या २० मिनिटांत तीनही आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. जखमी तरुणाची ओळख ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नुरू शेख अशी झाली आहे. तो परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. गोळ्या पाठीत लागल्याने नुरू शेख गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सुजल सुनील परदेशी याने आपल्या साथीदारांसह पूर्वीच्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून पाठलाग सुरू केला आणि मुख्य आरोपीसह तिघांनाही अवघ्या २० मिनिटांत जेरबंद केले.
भरदिवसा, तेही पोलिस चौकीसमोर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटनास्थळाचा पंचनामा केला आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून वापरण्यात आलेले शस्त्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर साथीदारांचा सहभाग याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत. या धाडसी कारवाईमुळे आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
