साईमत न्यूज नेटवर्क –
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या भाऊ-बहिणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, दोघांवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय भाऊ आणि ५३ वर्षीय बहीण हे मूळचे आसनगाव येथील रहिवासी आहेत. काही कामानिमित्त ते कल्याण येथे आले होते आणि स्टेशन परिसरातील ‘महाराष्ट्र लॉज’मध्ये वास्तव्यास होते. प्राथमिक तपासात गेल्या काही काळापासून दोघेही बेरोजगार असल्याने तीव्र नैराश्यात गेले होते. त्यातूनच त्यांनी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना त्वरित उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
या घटनेमागे केवळ बेरोजगारी हेच कारण आहे की अन्य आर्थिक, कौटुंबिक अथवा वैयक्तिक अडचणीही कारणीभूत आहेत, याचा सखोल तपास महात्मा फुले चौक पोलीस करीत आहेत.
