साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत “क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत निवड झालेले अडावद, वटार व रुखणखेडा या गावांमध्ये क्षयरोग आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या आदेशानुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरीता निबंध व विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच ग्रामसभा व चावडी बैठका घेवून त्यात क्षयरोग आजाराविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना भेट देऊन “टीबी सपोर्ट ग्रुप” ची स्थापना करण्यात आली. वटार येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी गावात प्रभातफेरी काढून त्यामध्ये “टीबी हारेगा, देश जितेगा”, “डॉट्सची गोळी, करी क्षयरोगाची होळी”, “क्षयरोगी कळवा, पाचशे रुपये मिळवा” अशा घोषणा दिल्या.
ग्रामपंचायतीत आयोजित बैठकीत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांना किशोर सैदाणे, आरोग्य सेवक विजय देशमुख यांनी अभियानाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी वटार व रुखणखेड्याचे सरपंच, ग्रामसेवक जयंत पाटील, वरिष्ठ क्षयरोग तपासणी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक किशोर सैंदाणे, आरोग्य सेवक विजय देशमुख, शिक्षक महाजन, सुलताने, आशा सेविका ज्योती कोळी, रेखा सोनवणे, गुलाब ठाकरे, नाना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.